पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर पुन्हा आसूड ओढला. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याबाबत आमचे एकमत आहे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांप्रती अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्सू यांनी दु:ख व्यक्त केले. त्यावेळी पंतप्रधानांनी ही एकजुटता दर्शवली. दहशतवादाचे समर्थन करणाºयांविरोधात कडक पावले टाकणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा बजावले. त्यामुळे पाकिस्तानची धडधड वाढली आहे. भारत केव्हाही हल्ला करू शकतो, ही भीती पाकला सतावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांच्यासह एक संयुक्त पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला. अंगोला आणि भारत या दोघांचे मत आहे की, दहशतवाद हा मानव जातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. आम्ही दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कडक कारवाईसाठी वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादविरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांचे आभार मानले. दहशतवादांविरोधात कडक पाऊल टाकण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा उद्धृत केली.
भारत अंगोला या देशाला सैन्य प्रशिक्षण आणि आधुनिकीकरणासाठी मदत करत आहे. अंगोला लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारत २०० लक्ष डॉलरची मदत करणार आहे. अंगोलाच्या सशस्त्र दलाला प्रशिक्षण देण्यात भारताला मदत करण्यात आनंद होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांच्या संबंधाला आता ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताने मदत केली आहे.