मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला अखेर स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्र वैद्यक परिषदेने ३० जून रोजी काढलेला आदेश अखेर रद्द करण्यात आला. होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सीसीआयमध्ये नोंदणीला अॅलोपॅथिक डॉक्टरांनी विरोध केला होता. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.
१६ जुलैपासून राज्यातील १ लाख होमिओपॅथिक डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार होते. त्यामुळे या निर्णयावरून कोंडी झाली होती. अखेर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला स्थगिती दिल्याने राज्यातील १ लाख होमिओपॅथिक डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सनी तीव्र विरोध दर्शवला होता. ८ जुलै रोजी आयएमएने सरकारला पत्र पाठवून होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात सराव करण्याची परवानगी दिल्यास लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. आता या स्थगितीमुळे सीसीएमपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी होणार नाही.
चार-पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एमबीबीएस, एमडी, एमएस अशा पदव्या मिळवणा-या डॉक्टरांना या एका निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बीएमसी, सरकारी डॉक्टरांची संघटना एमएजीएमओ आणि एएमसी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला.