आरोग्य, स्वच्छ ऊर्जा कर लादणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लवकरच जीएसटी कायद्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सिगारेट, शीतपेये, आलिशान कार आणि कोळसा यांसारख्या वस्तूंवर आरोग्य उपकर आणि स्वच्छ ऊर्जा उपकर लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे सर्वसामान्यांवर उपकरांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब-याच वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १२ टक्के जीएसटीचा स्लॅब रद्द करून ठराविक वस्तूंबाबतच दिलासा मिळू शकतो.
सरकार सध्याच्या नुकसान भरपाई उपकराच्या जागी दोन नवीन उपकर लागू करण्याची योजना आखत आहे. यामुळे सिगारेट, शीतपेये, आलिशान कार आणि कोळसा यांसारख्या उत्पादनांवर थेट परिणाम होईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. तंबाखू उत्पादने, सिगारेट आणि साखरयुक्त पेये यांसारख्या वस्तूंवर आरोग्य उपकर लागू केला जाईल. या वस्तू आधीच २८ टक्के कर स्लॅबमध्ये येतात. आता या वस्तूंपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी आणि सरकारला अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी त्यांच्यावर अतिरिक्त आरोग्य उपकर लावण्याची योजना आहे.
प्रदूषणकारी इंधनावर आता वाढीव कर!
स्वच्छ ऊर्जा उपकराचा उद्देश जास्त किमतीच्या गाड्या आणि कोळसा यांसारख्या प्रदूषणकारी इंधनावर कर वाढवून स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे आहे. सरकार १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. यामुळे काही उत्पादने ५ टक्के कराच्या श्रेणीत येतील तर काही १८ टक्क्यांच्या उच्च दरात समाविष्ट होतील. त्याचाही फटका बसणार आहे.