मुख्यमंत्र्यांनी केली ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प कामाची पाहणी
मुंबई : प्रतिनिधी
मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात एकूण तीन बोगदे असून एक बोगदा नऊ किलोमीटर लांब आणि २३ मीटर रुंदचा आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशात आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हादेखील एक विक्रम होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे वेळेच्या दृष्टीने प्रवाशांना फायदा होणार आहे. महामार्गावरील घाटमाथा असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे, असे म्हटले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे, असे म्हटले.