सॅटेलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार : गडकरी
मुंबई : प्रतिनिधी
येत्या १५ दिवसांत नवी टोल पॉलिसी जाहीर करण्यात येणार असून, या धोरणाचा भाग म्हणून सॅटेलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार केली जात आहे. यामुळे भविष्यात टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. थेट कॅमे-याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात, तिथून तुम्ही जिथून बाहेर पडाल, तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे. त्यामुळे तुमची कसलीही तक्रार राहणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या ७८ व्या व्याख्यानमालेत गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही, असे गडकरी म्हणाले. भविष्यात टोलनाके राहणार नाहीत, पण सॅटेलाईट सिस्टीमद्वारा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे कपात होतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली. तसेच पुढल्या दोन वर्षात इंडियन रोड इनफ्रा अमेरिकेपेक्षा चांगले राहील, असेही ते म्हणाले. तसेच मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.