सांगली दौऱ्यादरम्यान दिवंगत भारती महेंद्र लाड, कार्यकर्ता अतुल ढवळे आणि जयश्री पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वाहिली श्रद्धांजली
सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान त्यांनी राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कन्या तथा विधिमंडळ सदस्य डॉ. विश्वजीत कदम यांच्या भगिनी, भारती महेंद्र लाड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यासोबतच भाजपाचा तरुण आणि समर्पित कार्यकर्ता अतुल ढवळे आणि सांगलीचे माजी महापौर सुरेश आण्णा पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यांच्या कुटुंबीयांची देखील पाटील यांनी भेट घेतली.
राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कन्या तथा विधिमंडळ सदस्य डॉ. विश्वजीत कदम यांच्या भगिनी, भारती महेंद्र लाड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पाटील यांनी त्यांच्या कुंडल येथील निवासस्थानी भेट देऊन भारतीताईंना श्रद्धांजली वाहिली. ताईंच्या जाण्याने लाड आणि कदम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आम्ही सर्वजण या दु:खात सहभागी आहोत. ताईंच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो; अन् या दु:खातून सावरण्यासाठी लाड आणि कदम कुटुंबियांना बळ मिळो, अशी प्रार्थना यावेळी पाटील यांनी केली.
सांगलीतील भाजपाचा तरुण आणि समर्पित कार्यकर्ता अतुल ढवळे याचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. अतुलसारख्या कार्यकर्त्यांच्या जाण्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ आहे. चंद्रकांत पाटील यांनी ढवळे कुटुंबियांची भेट घेऊन अतुलला श्रद्धांजली वाहिली, आणि ढवळे कुटुंबियांचे सांत्वन केले.
सांगलीचे माजी महापौर सुरेश आण्णा पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे देखील काही दिवसांपूर्वी निधन झाले. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वहिनींना श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबियांचे सांत्वन केले. या दु:खातून सावरण्यासाठी पाटील कुटुंबियांना बळ मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.