राहुल गांधींचे आव्हान, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. पहलगाममध्ये भारतीयांवर निर्दयीपणे पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरच्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष जनतेने निवडून दिलेल्या सरकारसोबत उभा राहिला. मात्र, ऐनवेळी मोदी सरकारने युद्धविरामाची घोषणा केली. त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्यात दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलतात, हे लोकसभेत सांगावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनीही ऑपरेशन सिंदूरचे श्रेय पंतप्रधान मोदी घेतात. परंतु हल्ल्याची जबाबदारी का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित करीत जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी त्यांचे नातेवाईक गमावले त्यांना भेटल्यानंतर जे अनुभव आले ते लोकसभेत मांडले. राजनाथ सिंग यांनी त्यांच्या भाषणात १९७१ चे युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरची तुलना केली. १९७१ मध्ये राजकीय इच्छाशक्ती होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जगाची महासत्ता येत असताना पर्वा करत नसल्याचे सांगितले होते. त्यावेळी माणेकशॉ यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे एक देश निर्माण झाला. आता नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यात दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलतात, हे लोकसभेत सांगावे, असे आव्हान दिले.
राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर १.०५ ला सुरू झाले आणि ते २२ मिनिटात संपले. त्यानंतर १.३५ ला पाकिस्तानला कॉल करून सांगितले की, आम्ही लष्करी तळांना टार्गेट केलेले नाही. आम्हाला संघर्ष नको आहे. यातून तुम्ही लढण्याची राजकीय इच्छाशक्ती तुमच्यात नसल्याचे तुम्ही सांगितल्याचे राहुल गांधी राजनाथ सिंग यांच्या भाषणावरून म्हणाले. यासोबतच जेट का पडले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय चुका झाल्या, टेक्निकली चुका झाल्या, याचा शोध घेत आहे. पण अनिल चौहान यांची चूक झाली नाही, एअर फोर्सची चूक झाली नाही, चूक राजकीय इच्छाशक्तीची झाली, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधानांनी समजून घ्यावे की देश तुमची इमेज, राजकारण आणि पीआरच्या वर आहे. सैन्यदल तुमच्या पीआरच्या वर आहेत. तुमच्याकडे ते समजून घेण्याची विनम्रता असली पाहिजे, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. राहुल गांधी यांनी विदेश मंत्री एस. जयशंकर यांच्यावर देखील हल्लाबोल केला. जगातील सगळ््या देशांनी दहशतवादाचा निषेध केला. मात्र कोणत्याही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार?
देशात युद्ध सुरू होण्याआधीच संपले, हे युद्ध संपवण्याची भाषा आपले सैन्य करत नाही. सरकार करत नाही तर अमेरिकेत बसून डोनाल्ड ट्रम्प करतात. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे. ११ वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार, युद्धविराम का झाला याचे उत्तर दिले जात नाही. ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान मोदी करतात. परंतु हल्ल्याची जबाबदारी कोणच घेत नाही, अशा शब्दांत निशाणा साधत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.