मुंबई : प्रतिनिधी
आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. आझाद मैदानावर राज्यातील विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करत आहेत. त्यात सुप्रिया सुळे यांना शिक्षकांनी सगळे तुमच्या भावाच्या म्हणजेच अजितदादांच्या हातात आहे, बहीणीचे भाऊ ऐकेल. तुम्ही तुमच्या भावाला आधी सांगा. ते मागण्या मान्य करतील, असे सुप्रिया सुळे यांना म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा भाऊ जरी अर्थमंत्री असला तरी सरकारचा अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस या सगळ्याबाबत निर्णय घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हाय हाय असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटले की, आज शिक्षकांच्या मागण्यासाठी विधान भवनात जाते. सरकारची चर्चा करू. जर काही निर्णय घेत नसतील तर मी उद्या दिवसभरात तुमच्या सोबत असेल, असेही सुळेंनी म्हटले. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी आमदार रोहित पवारांना देखील या प्रश्नाबाबत विधानभवनात बोलावे, यासाठी फोन लावला. रोहित पवार विधानभवनात आहेत, त्यांना मी याबद्दल सांगणार सरकारशी बोल असे सांगते, असेही त्या म्हणाल्या. मी दोन-तीन शिक्षकांना सोबत घेऊन विधानभवनात जात आहे. उद्या मी शरद पवारांची तुमची भेट घालून देते, शांततेच्या मार्गाने चर्चेला बसूया, असेही पुढे सुळेंनी म्हटले आहे. तुमच्या सुखदुःखांना सरकारला वेळ नाही. आज शरद पवार रायगडमध्ये आहेत. आपल्याला या विरोधात लढावे लागणार आहे. आझाद मैदानावर बसून काही होणार नाही. मागणी मान्य नाही झाली तर विधानभवनात येईल, असेही पुढे सुळेंनी शिक्षकांशी बोलताना म्हटले.
टप्प्प्या-टप्प्याने अनुदानाची फक्त घोषणाच
राज्यातील सुमारे ५ हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर १० महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या ५,८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, १,९८४ माध्यमिक व ३,०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३,५१३ प्राथमिक, २,३८० माध्यमिक व ३,०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण ८,६०२ प्राथमिक शिक्षक, २४,०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६,९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत.
एकाही शाळेला निधी नाही
शाळांना २० टक्के टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात अद्याप एकाही शाळेला निधी मिळालेला नाही. तसेच अधिवेशनात यासाठी पुरवणी मागणीही मांडलेली नाही. परिणामी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ८ व ९ जुलै रोजी राज्यातील सर्व संबंधित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी सर्व शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समन्वयक संजय डावरे यांनी स्पष्ट केले. तसेच तातडीने निर्णय घेतल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा दिला.