मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा धडाका सुरू असून, मागच्या आठ दिवसांपासून रोज कुठे ना कुठे वादळी वा-यासह पाऊस पडत असल्याने उन्हाळी पिकांसह फळझाडे, घरांची प्रचंड हानी होत आहे. या अवकाळी पावसात आतापर्यंत राज्यात २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवार, दि. १९ मे २०२५ रोजी दिली.
अमरावती जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक १३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे तर नाशिकमध्ये ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. राज्यात खतांचा मोठ्या प्रमाणांत बफर स्टॉक आहे. खते आणि बियाणांचे लिंकिंग कोणी करणार नाही याच्या सक्त सूचना राज्यभरातील कृषी केंद्रांना दिल्या आहेत. बोगस बी बियाणे, खते देणा-यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा देखील माणिकराव कोकाटे यांनी दिला. येत्या काही दिवसात कृषी अधिका-यांच्या बदल्या केल्या जातील, असेही ते म्हणाले.
जाणूनबुजून गैरहजर
राहिल्यास कारवाई
जे अधिकारी जाणूनबुजून गैरहजर राहणार असतील याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. आधी कळवणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही कोकाटे म्हणाले. शासनाने आश्वासन दिल्यानंतरही जर कोणी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज खरीप हंगाम आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना चांगलेच फटकारले.