१४ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. १४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीनंतर त्याने सोमवार, दि. १२ मे २०२५ रोजी निवृत्ती जाहीर केली. या घोषणेनंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या घोषणेने चाहते आणि क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला.
कसोटी क्रिकेटमधील हा प्रवास मी हसतमुखाने पाहीन असं त्याने लिहिले आहे. मात्र, आयुष्यातील एक स्वप्न अधुरे राहिल्याचे दु:ख कायम त्याच्या मनात सलत राहील. विराटचे ते स्वप्न कसोटीतील १० हजार धावांशी निगडीत आहे. ते पूर्ण न करताच त्याने कसोटी क्रिकेटच्या या फॉरमॅटला अलविदा केला. आठवडाभरापूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचे संकेत त्याने दिले होते. परंतु या अगोदर हिटमॅन रोहित शर्माने कसोटीला अलविदा केला.
टेस्ट करिअर
विराट कोहलीने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २१० डावांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. पण विराट त्याच्या १० हजार कसोटी धावांच्या स्वप्नापासून अवघा ७७० धावा दूर होता. विराट कोहलीची कसोटी शतके आणि अर्धशतकांची संख्या जवळजवळ समान आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत.
एकूण क्रिकेट करिअर
-१२३ टेस्ट, २१० इनिंग्स, ९२३० रन, ४६.८५ ची सरासरी, ३० शतक, ३१ अर्धशतक
-३०२ वनडे, २९० इनिंग्स, १४१८१ रन, ५७.८८ सरासरी, ५१ शतक, ७४ अर्धशतक, ५ विकेट
-१२५ टी-२०, ११७ इनिंग्स, ४१८८ रन, ४८.६९ सरासरी, १ शतक, ३८ अर्धशतक, ४ विकेट