संजय राऊतांचा संतप्त सवाल
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जबाब देंगे म्हणजे, नेमके काय ? असा संतप्त सवाल शिवसेना, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दोन चार मशिदी पाडून हिंदू-मुसलमान करणार का? असेही त्यांनी विचारले आहे.
राऊत म्हणाले की, हे लोकं यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही. पहलगाम हल्ल्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत. गहमंत्रालयाचा वापर ते केवळ विरोधकांना संपवण्यासाठी करतात. ते एकप्रकारे गँग चालवतात. मात्र, ते दहशतवादी संपवत नाहीत तर देशाची लोकशाही संपवत आहेत.
पहलगाम हल्ल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की जशास तसे उत्तर देणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, जशास तसे उत्तर देणार म्हणजे, नेमके काय करणार. त्यांच्या लोकांना घेऊन ते सीमेवर जाणार आहेत का? असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. जशास तसे उत्तर दिले असते तर,२७ लोकांचे प्राण गेले नसते, ही नाटकं बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला.
एकनाथ शिंदेंमध्ये दम असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांचा राजीनामा मागावा, अशी मागणी त्यांनी केली. देशाच्या इतिहासातील अपयशी गृहमंत्री कोण असेल तर ते अमित शहा आहेत. धार्मिकद्वेषाच्या राजकारणामुळे ही घटना घडली. देश गुंडगिरी करून चालत नसल्याचे राऊत यांनी म्हटले.