चंदीगड : वृत्तसंस्था
हरियाणा आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून हेरगिरीचे जाळे समोर आले आहे. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांनादेखील मोठा धक्का बसला. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने भारतातील सामान्य महिला आणि तरुणांना गुप्त माहिती पाठवण्यासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल आणि पैशाचे माध्यम बनवले आहे. या प्रकरणी हरियाणाच्या प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रासह एकूण ६ जणांना अटक केली. हे सर्व जण पाकिस्तानशी संबंधित कार्यकर्त्यांना भारतातील संवेदनशील माहिती पाठवत होते.
आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधून ६ पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक दानिशशी संबंधित आहेत. दानिश हा पाकिस्तानच्या उच्चायोगातील अधिकारी आहे.ज्योतीने अय्याशी आणि महागडे शोक असल्यामुळे देशाचा विश्वासघात केल्याचे सांगितलं जाते. गेल्या २ वर्षांपासून ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होती, असे सांगितले जाते आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ट्रॅव्हल विद जो
नावाने युट्यूब चॅनल
ज्योती मल्होत्रा युट्यूबर असून, ‘ट्रॅव्हल विद जो’ नावाने चालणा-या तिच्या यूट्यूब चॅनेलला ३.७८ लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि ती सोशल मीडियावरील एक चर्चित चेहरा मानली जात होती. आता तिच्या अटकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्रामवर १.३३ लाख फॉलोअर्स, फेसबुकवर ३.२१ लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर जवळपास ४ लाख सब्सक्रायबर्स आहेत. ती मनाली, मसूरी, जैसलमेर, जयपूर आणि काश्मीरसारख्या भारतातील विविध पर्यटन स्थळांवर व्हीलॉग बनवून लोकप्रिय झाली होती.